असंघटित कामगार क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यात आली असून यापुढे स्वयंपाकी कामगार, पुजारी आणि पुरोहितांचाही असंघटित कामगार वर्गात समावेश करण्यात आला आहे. यासाठी कामगार खात्याने ई -श्रम http:// eshram.gov.in हे संकेतस्थळ तयार केले असून पात्र लाभार्थीने यावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई -श्रमद्वारे ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थींना श्रमिक कार्डांचे वितरण करण्यात येणार आहे. असंघटित कामगार वर्गासाठी असणारी सामाजिक सुरक्षितता आणि विविध योजनांचा लाभ स्वयंपाकी कामगार, पुजारी आणि पुरोहितांनाही यापुढे मिळणार आहे. यामध्ये नैसर्गिक मृत्यू अथवा पूर्णपणे व्यंगत्व आल्यास प्रधानमंत्री आरोग्य विमा योजने अंतर्गत 2 लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
तसेच कांही प्रमाणात दिव्यांग तत्व आल्यास 1 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. अन्य असंघटित वर्गाच्या कामगारांना असणाऱ्या योजनांचा लाभही या वर्गाला देण्याचा विचार सुरू आहे. मात्र यासाठी कांही अटी व नियम घालण्यात आले आहेत.
उत्पन्न कर भरणाऱ्यांना असंघटित विभागात नांव नोंदणीची सुविधा असणार नाही. यासाठी 15 ते 59 वयोगटातील इच्छुकांना नांव नोंदवता येईल. राज्यातील कोणत्याही विमा महामंडळ (एलआयसी) आणि कामगार भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) संस्थेचे सदस्य असणाऱ्यांना लाभ मिळणार नाही.
नोंदणीसाठी केवायसी पूर्ण झालेले आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडणे आवश्यक आहे. ई-श्रम संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन नोंदणी करताना वैयक्तिक माहितीसह उत्पन्नाचा दाखला आणि शैक्षणिक प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. याशिवाय अन्य आवश्यक माहिती देणे गरजेचे आहे.