गुजरात निवडणुका जिंकल्या नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपला मोर्चा कर्नाटक कडे वळवला असून आगामी जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात केंद्रातील नेते बेळगावात येणार आहेत.फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आगामी विधानसभा निवडणुकीची आचासंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने भाजपचे केंद्रीय नेते कर्नाटक दौरा करण्याची शक्यता आहे.
गुजरात निवडणुकीनंतर भाजप नेत्यांनी आता कर्नाटक निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे केंद्रीय नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याला भेट देऊन भाजपच्या मेळाव्यात भाग घेणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावात होणाऱ्या भाजप रयत मोर्चाच्या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत.
भाजपच्या विविध समित्यांचे समन्वयक भानुप्रकाश व सरचिटणीस सिद्धराज यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप कार्यालयात पक्षाच्या विविध सभा व मेळाव्यांची माहिती दिली. पंतप्रधान मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात येणार असून बेळगाव येथील भाजप रयत मोर्चाच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चित्रदुर्ग येथे होणाऱ्या एससी मोर्चाच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
भाजप युवा मोर्चाचे अधिवेशन १२ जानेवारी रोजी उडुपी येथे होणार असून, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा १५ डिसेंबरला बागलकोट जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. तसेच, १८ डिसेंबर रोजी बंगळुर येथे विविध समित्यांची परिषद होणार असून, राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.या महिन्याच्या २१ आणि २२ तारखेला मुरुडेश्वर येथे राज्याच्या पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.