मी कोणालाही भीत नाही. मी बेळगावला जाणारच आणि तेथे जाऊन 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करणार, असे महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकच्या दौऱ्यावर धाडू नये महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांना बेळगावला पाठवू नये अशी विनंती कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना केली आहे अशी माहिती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना आपण बेळगावला येणारच, असे स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनीही आपली परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही हा घटनेने दिलेला अधिकार आहे आणि जर महाराष्ट्र सरकारला जमत नसेल तर तर आम्ही कर्नाटकात जाऊ, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.