बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने सुरू करण्यात आलेली हरेकृष्ण रथयात्रा यंदा 28, 29 व 30 जानेवारी 2023 रोजी होणार असल्याची माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी दिली.
यंदा रथयात्रेचे 25 वे म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या रथयात्रेच्या निमित्ताने इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिराच्या परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार असून यावर्षी देशभराच्या विविध भागातून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर इस्कॉन चळवळीतील अनेक ज्येष्ठ स्वामीजी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
रथयात्रेच्या निमित्ताने मंदिरातील भक्तांची एक समिती नियुक्त करण्यात आली असून ती जोमाने कार्यरत झाली आहे. दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने रथयात्रा थोडक्यात साजरी करण्यात आली होती मात्र यंदा ही रथयात्रा दरवर्षीपेक्षा अधिक भव्यतेने साजरी केली जाणार आहे.
भजन, कीर्तन, प्रवचन , नाट्यलीला, अध्यात्मिक ग्रंथांचे वितरण, महाप्रसादाचे वितरण आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन रथयात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. असेही भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी सांगितले .
ही रथयात्रा तारीख 28 रोजी दुपारी 1 वा. धर्मवीर संभाजी चौकातुन एक वाजता निघून बेळगाव आणि शहापूरच्या विविध रस्त्यावरून मन्दिरकडे येणारआहे भाविकांनी याच्यात सहभागी व्हावे आणि आपले अमूल्य योगदान द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.