Sunday, December 1, 2024

/

ॲल्युमिनियमसाठी पेट्रापॅकची होळी

 belgaum

शीतपेयांच्या टेट्रापॅक मधील ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी क्लब रोडवरील रस्त्याशेजारी असलेल्या झाडांखाली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा पेटवून देण्याचा गैरप्रकार सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला. त्यामुळे रस्त्याकडेला कचरा टाकू, नका जाळू नका, परिसर स्वच्छ ठेवा हे सर्व नियम फक्त जनतेलाच लागू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कॅम्प हद्दीतील क्लब रोडवरील ज्योती कॉलेज समोर आज सकाळी महापालिकेच्या दोन कचरा गाड्या (क्र. केए 22 ए 9640 आणि केए 22 बी 8385) रस्त्यावर थांबून स्वच्छता कर्मचारी शेजारील मोठ्या झाडांखाली कचरा एकत्र करून जाळत होते. हा गैरप्रकार त्या रस्त्यावरून जाणारे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपली गाडी थांबवून त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

तेंव्हा प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यानंतर पेटवलेला कचरा विझवला. त्यावेळी त्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात शीतपेयांचे ॲल्युमिनियमचे टेट्रापॅक असल्याचे अनगोळकर यांच्या निदर्शनास आले आणि कचरा पेटवण्याचा मूळ उद्देश त्यांच्या ध्यानात आला. तथापि या पद्धतीने कचरा पेटवून दिल्यामुळे झाडांचे मुळापासून नुकसान होणार असल्याने सुरेंद्र अनगोळकर यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.Burnt tree

दरम्यान, टेट्रापॅकच्या ॲल्युमिनियममधून चार पैसे मिळवण्यासाठी या पद्धतीने शहरात अन्यत्रही स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून हा प्रकार सर्रास केला जात असल्याचे समजते. मात्र महापालिका हद्दीतील कचरा कॅम्प हद्दीतील झाडांखाली जाळण्याच्या या प्रकाराबद्दल वृक्षप्रेमीमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.

तसेच लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वृक्षराईचे नुकसान करणाऱ्या अशा गैरप्रकारांना तात्काळ आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.