बेळगावातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यावरून चालताना पाय तरी कुठे ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रकार हिंदवाडी येथील डॉक्टर आर के मार्ग येथे पाहायला मिळत आहे .
मागील दोन आठवड्यांपासून या रस्त्यांची खोदाई झाली असून याठिकाणी चालण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यातच पाऊस पडत असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून मागील दोन आठवड्यापासून या भागात नागरिकांचे जगणे अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती नेमकी का झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता एल अँड टी कंपनीने या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी च्या पाईपलाईन करण्याचे काम हाती घेतले असून, त्यासाठी ही खुदाई झाली आहे .
मात्र त्यानंतर रस्ता सुस्थितीत करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून या भागात रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. ही परिस्थिती नेमकी किती दिवस राहणार याची पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही.
शिवाय लवकरात लवकर निवारण होणार की नागरिकांनी श्रमदानातून हा रस्ता सुरळीत करायचा आहे ?याबद्दल अद्याप कोणालाही कल्पना नसल्यामुळे सध्या नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड बनले आहे.