कोरोना आणि ओमिक्रोन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज मंगळवारपासून आठवडाभरासाठी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ लागू केला आहे. ऐन 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरच नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत येण्याबरोबरच थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांवर विरजण पडले आहे.
राज्यात आजपासून आठवडाभर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे थर्टीफर्स्ट अर्थात 31 डिसेंबर रोजी रात्री सर्वांनी एकत्र येऊन ओल्ड मॅन जाळणे, रस्त्यावर रात्र जागून पार्टी करणे असे प्रकार करता येणार नाहीत. शासनाच्या ‘नाईट कर्फ्यू’च्या निर्णयामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.
युवकांनी मात्र थर्टीफर्स्ट पार्टी आणि नववर्षाचे स्वागत करण्याचा चंग बांधल्याचे दिसत आहे. त्यामुळे बेळगावकरांची थर्टीफर्स्टची रात्र ही शेत शिवारात किंवा गोव्यातच साजरी होणार असून नववर्षाचे स्वागत ही तेथेच केले जाणार आहे. शहरातील युवावर्गाने यंदा आपला थर्टी फर्स्ट गोव्यात साजरा करण्याचा म्हणजे तेथे पार्टी करण्याचा बेत आखण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर यासंबंधी चर्चेला ऊत आला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील युवक मात्र शेतातच थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे निमंत्रण शहरातील लोकांना देत आहेत. गोवा सरकारने नाईट कर्फ्यू आणि इतर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बहुतेक जणांचा कल गोव्याला जाण्याकडे आहे.
यंदा देखील अनेक युवक शेतात नववर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक असल्यामुळे शहराबाहेर असणाऱ्या फार्महाऊसवर मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे काहींनी थेट शिवारातच स्वयंपाक करून पार्टी करण्याचा बेत आखला आहे. यासाठी शहरातील युवावर्ग ग्रामीण भागातील आपल्या मित्रांची संपर्क साधून पार्टीचे नियोजन करत आहेत.