कर्नाटक राज्यात ओमिक्राॅनचे 2 रुग्ण आढळल्यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज शुक्रवारी तज्ञांसह ज्येष्ठ मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक घेत आहेत.
या बैठकीत संसर्ग रोखण्यासाठी नवी मार्गदर्शक सूची अंमलात आणण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली येथून मुख्यमंत्री बोम्मई बेंगलोरला परतल्यानंतर आज शुक्रवारी दुपारी ही बैठक होणार आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्राॅनचा संसर्ग रोखण्यासाठी हाती घ्यावयाच्या उपाय योजनांसंदर्भात आपण तज्ञांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी दुपारी आपत्तकालीन बैठक बोलावली आहे.
सदर समस्येबाबत केंद्रांतील तज्ञांशी देखील चर्चा केली जाईल. त्यानंतर नवी मार्गदर्शक सूची तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे विधान त्यांच्या कार्यालयाने गुरुवारी रात्री उशिरा प्रसिद्धीस दिले आहे.
दरम्यान, कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील बाची आणि कोगनोळी चेकपोस्टच्या ठिकाणी कोरोना तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना किंवा आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिली जात आहे. याखेरीज रॅपिड टेस्टची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वोत्तम उपाय योजना हाती घेतल्या जातील. काळजी करण्याचे कारण नाही किंवा विनाकारण संभ्रम अथवा अटकळी बांधण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी काल गुरुवारी रात्री स्पष्ट केले आहे.