छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली .इस्लामी साम्राज्याच्या विरोधात मुघल राजांना टक्कर देऊन हिंदुस्तानात हिंदू म्हणून जगण्याची शक्ती शिवरायांनी दिली. मात्र आज कर्नाटकात सोशल मीडिया पेज वरून काही कन्नड संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात मोहीम आखत आहेत.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवरायांना आपले दैवत मानतात. कर्नाटकातील भाजप सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून निवडणूक लढवते.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सरकारी पद्धतीने साजरी व्हावी यासाठीही प्रयत्न केले जातात. अशा वेळी त्याच भारतात आणि त्याच कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहीम आखली जाणे. ही दुर्दैवाची बाब आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला असून कर्नाटक सरकार व भारत सरकारच्या सायबर सेलने आता या पद्धतीने सोशल मीडियावर शिवाजी महाराजांच्या विरोधात मोहीम चालवणाऱ्या महाभागांची योग्य ती दखल घेण्याची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सूर्य आहेत. या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होण्याची गरज असून याप्रकरणी आता आवश्यक तो लढा देण्याची गरज आहे. काही सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची नाहक बदनामी करणाऱ्या व्यक्तींना कोणता धडा शिकवला जाणार? त्यांच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई करणार? आता कर्नाटक सरकारने लवकरात लवकर जाहीर करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचे शिवरायांवरील बेगडी प्रेम लक्षात येणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातील पर्यायाने सीमाभागातील काही लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ कर्नाटकाचे आणि कन्नडिगा होते, या प्रकारचा शोध यापूर्वी लावला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांना कन्नड म्हणणाऱ्यांनी आता त्यांनाच कन्नड विरोधी दाखवून कन्नड मधून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रकार का सुरू केला ?याचा शोध घेण्याची सध्या गरज आहे. या प्रकरणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवश्यक ती मोहीम राबवण्याची पूर्ण तयारी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.