कैथाल -हरियाणा येथे येत्या 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्टार कबड्डी लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथील अनिकेत मारुती पाटील या होतकरू कबड्डीपटूची अभिनंदनीय निवड झाली आहे. यापद्धतीने राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक कबड्डी स्पर्धेसाठी निवडला जाणारा खानापूर तालुक्यातील तो पहिलाच कबड्डीपटू आहे.
देशभरात प्रो -कबड्डी लीगचे वारे वाहत असताना येत्या 24 डिसेंबरपासून कैथाल -हरियाणा येथे राष्ट्रीय स्तरावरील स्टार कबड्डी लीगच्या दुसऱ्या मोसमाला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 55 किलो वजनी गट विभागात चंदीगड चिताज, भोपाळ सूरमाज, झारखंड स्टार, दिल्ली डेसलर्स, हरियाणा पँथर्स, पुणे वॉरियर्स, हैदराबाद हंटर्स आणि चेन्नई सोरस हे 8 कबड्डी संघ एकमेकांविरुद्ध लढत देणार आहेत.
यापैकी हरियाणा पँथर्स कबड्डी संघामध्ये कुप्पटगिरी खानापूरच्या चेष्ट नं. 1793 असणाऱ्या अनिकेत मारुती पाटील याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश आहे. या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर व्यवसायिक कबड्डीपटू म्हणून पदार्पण करणारा अनिकेत हा खानापूर तालुक्यातील पहिलाच कबड्डीपटू आहे.
कबड्डीपटू अनिकेत पाटील याला शालेय जीवनापासून कबड्डी खेळाची आवड असून आत्तापर्यंत त्याने अनेक ठिकाणच्या कबड्डी स्पर्धांमध्ये भाग घेऊन चमकदार कामगिरी बजावली आहे.
कबड्डीतील अष्टपैलू खेळाडू म्हणून सुपरिचित असणारा अनिकेत कुप्पटगिरी संघाचे तर प्रतिनिधित्व करतोच, याखेरीज त्याने पिरनवाडी येथील पी. एम. स्पोर्ट्स क्लब कबड्डी संघाचेही समर्थ नेतृत्व केले आहे. आपल्या समर्थ नेतृत्वच्या जोरावर त्याने पी. एम. स्पोर्ट्स क्लब कबड्डी संघाला चांगला नांवलौकिक मिळवून दिला आहे.
नंदगड (ता. खानापूर) येथील एम. जे. हायस्कूल येथे त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले असून रावसाहेब वागळे महाविद्यालय खानापूर येथून त्याने पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. गोवा येथे घेण्यात आलेल्या निवड चांचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने त्याची हरियाणा पॅंथर्स संघासाठी निवड झाली आहे. याप्रकारे राष्ट्रीय स्तरावरील स्टार कबड्डी लीग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अनिकेत पाटील त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.