कर्नाटक राज्यातील 22 शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा शिक्षण अधिकारी पदावर बढती देण्याबरोबरच 8 जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांचाही समावेश असून त्यांच्या जागी बसवराज नलतवाड यांची बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
शिक्षण खात्याने काल सोमवारी सायंकाळी यादी जाहीर करत विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अनेक शिक्षणाधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत, तर कांही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या इतर ठिकाणी बदल्या करण्यात आले आहेत.
ए. बी. पुंडलिक हे गेल्या कांही वर्षांपासून बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांची बदली बेळगाव येथील सरकारी बीएड महाविद्यालय येथे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारी बीएड महाविद्यालयात कार्यरत असणारे शिक्षणाधिकारी नलतवाड यांना बढती मिळाली असून बसवराज नलतवाड आता जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहेत.
नलतवाड यांनी यापूर्वी शहर गटशिक्षणाधिकारी पदावर काम केले आहे. तसेच इतर ठिकाणीही ते गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.
चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी पदी मोहन हल्ल्याटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. अचानकपणे विविध शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.