आयटीआय अभ्यासक्रमातील प्रॅक्टीकल परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या रामदुर्ग सरकारी आयटीआय कॉलेज प्राचार्य आणि शिपायाला भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना आज गुरुवारी घडली.
परीक्षा केंद्राचे प्रमुख असणारे प्राचार्य रामनगौडा बाबागौडा पाटील आणि कॉलेज शिपाई बसवराज रामाप्पा मोहिते अशी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार सुधीर नीद्दनकोळ्ळ यांनी केलेल्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने सापळा रचून आज गुरुवारी 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (उत्तर वलय) पोलीस अधीक्षक बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी डीवायएसपी महांतेश्वर गळाद, अधिवेश गुडीगोप्प व सुनीलकुमार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपरोक्त कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.