Tuesday, December 3, 2024

/

आसपासच्या गावांना सामावून बुडा व्याप्तीचा होणार विस्तार

 belgaum

बेळगाव शहराच्या आसपासच्या 28 गावांचा आपल्या कार्यक्षेत्रात अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) घेतला आहे.

मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तंत्रज्ञानाच्या आधारे बेळगाव शहराचा विस्तार करण्यास अनुमती देण्यात आली आहे. या नव्या शहरी एकत्रीकरणामुळे विविध खेडी व गावांचा स्थानिक नियोजन क्षेत्रात अंतर्भाव होणार आहे.

बेळगाव शहराच्या आसपास असलेल्या 28 गावांचा बुडा कार्यक्षेत्रात समावेश करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.

ही प्रक्रिया बुडा अधिकारी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जीआयएस मॅपिंग, नगर रचना, पाणलोट, भुयारी गटार, वाहतूक आणि कचरा विल्हेवाट क्षेत्रातील तज्ञांच्या सहकार्याने पार पाडणार आहेत. दरम्यान बुडा आयुक्त शकील अहमद यांनी सध्याच्या मास्टर प्लॅनची मुदत संपली असल्यामुळे सुधारित मास्टर प्लॅनची अंमलबजावणी होईपर्यंत जुना प्लॅन अस्तित्वात असेल असे स्पष्ट केले आहे.

मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शहरांमधील आणि बुडा कार्यक्षेत्रात अंतर्भाव केल्या जाणाऱ्या आसपासच्या प्रदेशातील रस्ते, भुयारी गटार, उद्यान आणि इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देताना आवश्यक नियमांचे काटेकोर पालन केले जावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.Buda

बयावेळी बोलताना महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव शहराच्या आसपास आवश्यक पुरेशी जमीन उपलब्ध असल्यामुळे जवळपास 1 लाख लोक सामावू शकतील इतक्या क्षमतेचे स्टेडियम उभारण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे नव्या निवासी लेआउट्सना परवानगी देण्यापूर्वी सर्वप्रथम नियमाला धरून त्यांची सखोल तपासणी केली जावी असे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बैठकीत बोलताना कणबर्गी येथील नव्या निवासी लेआउटच्या विकासासाठी 87 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांसह अन्य विकास प्रकल्पांसाठी 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.