बेळगाव लाईव्ह :भारतीय हवाई दलाच्या बेळगाव येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या 155 महिला अग्नीवीर प्रशिक्षण घेत असून याबरोबरच लढाऊ शाखेत (फायटर ब्रांच) 17 महिला अधिकारी आहेत, अशी माहिती एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिली. हा लक्षणीय विकास भारतीय संरक्षण दलांमध्ये नारी शक्तीच्या माध्यमातून होत असलेली प्रगती दर्शविणारा आहे असेही त्यांनी सांगितले.
संरक्षण दलांमध्ये पुरुषांचे वर्चस्व संपुष्टात आणण्याबरोबरच स्त्री पुरुष लिंगभेद खऱ्या अर्थाने दूर करण्यासाठी 2015 साली नारी शक्ती उपक्रम सुरू करण्यात आला. या अभूतपूर्व योजनेमुळे पूर्वी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या संरक्षण दलातील लढाऊ पथकात सामील होण्यासाठीची द्वारे महिलांसाठी खुली झाली.
महिलांना प्राधान्य देण्याची फलनिष्पत्ती म्हणजे भारताने देशातील पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांचे स्वागत केले. सध्या भारतीय हवाई दलाच्या बेळगाव येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या 155 महिला अग्नीवीर म्हणजे नारी शक्तीच्या प्राधान्याला मिळालेल्या यशाचे उदाहरण आहे. या उपक्रमाने महिलांना केवळ लढाऊ दलात सेवा करण्याची संधीच उपलब्ध करून दिली नाही तर संरक्षण दलातील लिंग समानतेचा मार्ग मोकळा केला.
सध्या सेवा बजावत असलेल्या 17 महिला अधिकाऱ्यांचा लढाऊ शाखेतील अंतर्भाव हा त्यांचा दृढनिश्चय आणि क्षमता दर्शविणारा आहे. संरक्षण दलासारख्या प्रतिष्ठित आणि मागणी असलेल्या क्षेत्रातील त्यांची उपस्थिती त्यांच्या देशाची सेवा करण्याची वचनबद्धता आणि पारंपारिक पुरुष मक्तेदारी मोडून काढण्याची क्षमता दर्शवणारी आहे.
नारी शक्ती उपक्रमाने भारतीय संरक्षण दलातील महिलांच्या सक्षमीकरणात आणि समावेशकतेला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. लिंगभेदाचा अडथळा दूर करण्याबरोबरच या उपक्रमाने संरक्षण दलातील प्रतिभेच्या डोहाचा विस्तार वाढविण्याबरोबरच वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वातावरण देखील वाढविले आहे.