पाॅलाइट्स ऑफ बेळगाम वर्ल्ड वाईड यांच्यातर्फे येत्या मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूलमध्ये या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय समाजसेवेबद्दल त्यांना या समारंभाच्या माध्यमातून गौरविले जाणार आहे. संतोष दरेकर हे सेंटपॉल हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या दरेकर यांनी आपल्या फेसबुक फ्रेंड्स सर्कल या संघटनेच्या माध्यमातून रक्तदानाच्या बाबतीत भरीव कार्य केले आहे. याखेरीज गोरगरीब असहाय्य लोकांना वैद्यकीय सुविधा तसेच जीवनावश्यक साहित्याचे सहाय्य करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.
आपल्या या सहाय्याद्वारे त्यांनी असंख्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. दरेकर यांच्या वैद्यकीय सहाय्यामुळे केल्या 17 वर्षात आजतागायत सुमारे 5500 रुग्णांचा जीव वाचला आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
त्या काळात कोरोनाग्रस्त 169 रुग्णांना त्यांनी जीवनदान देण्याचे प्रेरणादायी कार्य केले आहे. जनहितार्थ कार्य करण्याबरोबरच संतोष दरेकर मूक प्राणी -पक्षांच्या हितासाठी देखील नेहमी कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत पाॅलाइट्स ऑफ बेळगाम वर्ल्ड वाईड यांच्यातर्फे येत्या मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.