बेळगाव लाईव्ह : शहराप्रमाणेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कुटुंबांना यापुढे घरपट्टीचा अधिक आर्थिक भार उचलावा लागणार आहे. ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणानुसार नव्याने कर निर्धारण केले जाणार असून हे सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण होताच बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नवी करप्रणाली सुरू होणार आहे. शासनाने नव्यानेच विकसित केलेल्या पंचतंत्र २.० संकेतस्थळावर ही नोंद होत असून ग्रामपंचायतीची कर पावती देखील यापुढे ऑनलाईन मिळणार आहे. यापुढे ग्रामपंचायतीचा कर हा उपनिबंधक कार्यालयाकडून ठरवण्यात आलेल्या मालमत्तेच्या दरानुसार असणार आहे.
यापूर्वी ग्रामपंचायतीकडून घरफाळा पट्टी ही ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याकडून ठरविण्यात आलेल्या दराप्रमाणे आकारली जात होती. त्यानुसार एखाद्या गावठाण प्रदेशातील एक गुंठा जमिनीवर असलेल्या घरासाठी ५०० ते ५५० रुपये कर स्वरूपात घरपट्टी भरावी लागत होती. पण आता सब रजिस्टर कार्यालयाकडून ठरविण्यात आलेल्या दराच्यानुसार कर आकारणी ग्रामपंचायतीकडून केली जाणार आहे. त्यामुळे नवीन कर प्रणाली ही सध्याच्या प्रणालीपेक्षा सहा ते सात पटीने अधिक असणार आहे.
शहराजवळ असलेली ग्रामपंचायत, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाला लागून असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये जर पाचशे रुपये कर असल्यास तो यापुढे ३००० ते ३५०० इतका होण्याची शक्यता आहे. राज्यातील तुमकूर जिल्हा पंचायतीसह अन्य एका जिल्हा पंचायतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही नवी कर आकारणी सुरू करण्यात आली असून ती यशस्वी ठरली आहे. त्यानुसार आता बेळगाव जिल्हा पंचायतीसह राज्यातील इतर जिल्हा पंचायतीमध्ये मालमत्ता सर्वेक्षणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. यात ग्रामपंचायतीकडून घरांची मोजदाद केली जात असून ग्रामपंचायतीकडून ती ऑनलाईन नोंद केली जात आहे.