Tuesday, November 19, 2024

/

दुग्धाभिषेक सोहळ्यात प्रशासकीय आडकाठीचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून बेळगावमध्ये सुरु झालेल्या राजकारणात दोन राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या गलिच्छ राजकारणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने १९ मार्च रोजी राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. यासंदर्भात सीमाभागात होत असलेली जनजागृती पाहून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडे मराठी जनता आकर्षित होऊ नये यासाठी या सोहळ्याला आडकाठी आणण्याची रणनीती सुरु झाली आहे.

१९ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रशासकीय दबाव आणण्यात येणार असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. बेळगावमधील बसवेश्वर सर्कल येथील संत बसवेश्वर महाराजांच्या कांस्यमूर्तीच्या पायाभरणी समारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजहंसगडावर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजिलेल्या कार्यक्रमासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागाशी आपण चर्चा करू. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे येत्या १९ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमास पुन्हा जाणीवपूर्वक प्रशासकीय दबाव तंत्र वापरून आडकाठी करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेळगाव दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येळ्ळूर येथील राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यात देखील राजकीय स्वार्थ साधून मराठी भाषिकांवर छाप पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय शिष्टाचार पाळून लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. मात्र संतापलेल्या मराठी भाषिकांनी आणि शिवभक्तांनी पुन्हा मूर्ती शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतल्याने कर्नाटक सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भारतीय राज्यघटनेने संविधानानुसार प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अभिषेक करण्यापासून रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, नेहमीप्रमाणे नाहक कारवाईचा बडगा उगारणाऱ्या कर्नाटक सरकारने हा सोहळादेखील दडपशाहीने थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून कर्नाटक सरकारने जर या सोहळ्यास आडकाठी लावली तर सीमाभागातील जनतेसह समस्त शिवभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, यात शंका नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.