Saturday, April 27, 2024

/

बेळगाव जिल्ह्यातील ११६०० जणांना हक्कपत्रांचे वितरण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रामदुर्ग तालुक्यातील बटकुर्की येथे बुधवारी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते हक्कपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अनेक कायदेशीर समस्या सोडवून लमाणी तांडा, गोल्लारहट्टी, कुरुबरहट्टी या गावांचे महसुली गावात रूपांतर झाले आहे. पंतप्रधानांनी नुकतेच कलबुर्गीतील ५० हजारांहून अधिक लोकांना हक्कपत्र वितरित केली असून येत्या काळात दावणगेरेतील आणखी ५० हजार लोकांना हक्कपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना हक्क मिळवून देण्याबरोबरच या योजनेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मलप्रभा नदीच्या काठावर पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी संरक्षण भिंत, केंद्र सरकारने दिलेल्या नुकसानभरपाईपेक्षा दुप्पट पीक नुकसानीची भरपाई, पीएम-किसान योजनेअंतर्गत ५.६१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ११३० कोटी रुपये, जलजीवन मिशन योजनेंतर्गत तीन वर्षांत देशातील 12 कोटी आणि राज्यातील 40 लाख कुटुंबांना पाणीपुरवठा, गॅस कनेक्शन आणि वीज यासह कुटुंबाला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, रोजगार निर्मिती, आरक्षण वाढीचा निर्णय, शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन हजार बसची सुविधा, स्त्रीशक्ती संघांना मदत उपलब्ध करून देण्यासहीत कितीही अडचणी असल्या तरी समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन सरकार धाडसी निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी, प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या कळसा- भांडुरा प्रकल्पाला केंद्राकडून हिरवा कंदील मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे यांनी सांगितले. डीपीआरला मंजुरी मिळण्याबरोबरच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करून त्यांनी आपली बांधिलकी दाखवली आहे अशी प्रतिक्रिया इरण्णा कडाडी यांनी व्यक्त केली.

 belgaum

यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, आदिजांबव विकास महामंडळाचे अध्यक्ष दुर्योधन ऐहोळे, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो लाभार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.