Monday, December 30, 2024

/

भगव्या फेटांसह समिती नगरसेवक वेधून घेत होते लक्ष

 belgaum

प्रतिष्ठेच्या बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र महापौर पदासाठीचा उमेदवार कोण? हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी शेवटच्या क्षणी महापौर कोण? हे जाहीर होणार आहे. काँग्रेसने महापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

बेळगाव महापौर पदासाठी चार जण इच्छुक असून त्यामध्ये भाजपच्या नगरसेविका शोभा सोमानाचे, नगरसेविका सारिका पाटील, नगरसेविका वाणी जोशी आणि नगरसेविका दिपाली टोपगी यांचा समावेश आहे. या चौघींपैकी एकीचे नांव महापौर पदासाठी जाहीर होणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. या कालावधीत भाजपच्या उपरोक्त चारही नगरसेविका अर्ज दाखल करणार आहेत. यापैकी कोण तीन नगरसेवक आपला अर्ज मागे घेणार हे दुपारी 1 नंतर स्पष्ट होणार आहे.

बेळगाव उपमहापौर पदासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौर पदासाठी आवश्यक इतर मागास ब प्रवर्गातून निवडून आलेली नगरसेविका आपल्याकडे असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. आज सकाळी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका वैशाली भातकांडे आणि नगरसेवक शिवाजी मंडोळकर या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीनही नगरसेवकांनी भगवे फेटे बांधून महापालिकेत प्रवेश करताना साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या तीन नगरसेवकांनी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराज की जय, पुण्यश्लोक छ. संभाजी महाराज की जय, हिंदुराष्ट्र की जय अशा घोषणा देत सभागृहाकडे प्रस्थान केले.

यावेळी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले की उशिरा का होईना प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यामुळे प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळेच अखेर आता नगरसेवक म्हणून आमचा शपथविधी होणार आहे. यासाठी सर्वप्रथम मी प्रसार माध्यमांना धन्यवाद देतो. गेल्या 4 वर्षात महापालिका प्रशासनाने कशा पद्धतीने कारभार चालवला हे सर्वश्रुत आहे. या संदर्भात सभागृहाच्या माध्यमातून आम्ही स्मार्ट सिटी असो किंवा इतर विकास कामे असोत कशा पद्धतीने केली गेली? याबद्दल जाब विचारणार आहोत असे सांगून सभागृहात यावेळी प्रथमच आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक संख्येने कमी असलो तरी विकास कामे आणि मराठी संदर्भात आवाज उठवून विषय मांडणार आहोत असेही नगरसेवक साळुंखे यांनी स्पष्ट केले. बेळगाव महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक तब्बल दीड वर्षानंतर होत आहे. महापालिकेत काँग्रेसचे 14 भाजपचे 35, महाराष्ट्र एकीकरण समितीचे 3 आणि अपक्ष नगरसेवक असे मिळून एकूण 58 नगरसेवक आहेत. भाजपकडे बहुमत असल्यामुळे महापौर त्यांचाच होणार हे निश्चित असले तरी तो नेमका कोण असणार हा गुंता अद्याप सुटलेला नाही. बेळगाव महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.Marathi corporator

निवडणूक प्रक्रिया पुढील प्रमाणे होणार आहे. आज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दोन्ही पदासाठी अर्ज दाखल करणे. दुपारी 3 वाजता मुख्य निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर प्रादेशिक आयुक्त हिरेमठ यांच्याकडून अर्जांची पडताळणी केली जाईल. पडताळणीनंतर वैध ठरलेल्या अर्जांची घोषणा केली जाईल आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवधी दिला जाईल. त्यानंतर रिंगणात राहिलेल्या उमेदवारी अर्जांची घोषणा आणि शेवटी हात उंचावून नगरसेवकांचे मतदान होईल.

काँग्रेस नगरसेवक ही महापालिका सभागृहात दाखल झाले असून बारा वाजले तरी अद्याप भाजप नगरसेवकांनी नेते दाखल झालेले नाही आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.