Sunday, May 5, 2024

/

महापौर निवडणूक: काँग्रेसचा हा निर्णय काढणार फुग्यातील हवा

 belgaum

अनेक महिने विलंब झालेली बेळगावच्या महापौर निवडीची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीची हवाच काढून घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने घेतला आहे. याला दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे. या निवडणुकीत काँग्रेस तर्फे एकही उमेदवार अर्ज भरणार  नाही. नगरसेवक पदाची शपथ घेऊन सर्वजण बाहेर पडणार आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी निवडणुकीतील चुरस आणि एकंदर सत्ता संघर्ष पाहायला मिळणार नाही. हे तितकेच खरे आहे.

काँग्रेस पक्षाने राजू उर्फ असिफ शेठ आणि सुनील हणमन्नावर यांना महापौर निवडणुकीच्या नियोजनाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संख्याबळ अपुरे असले तरी निवडणुकीत सहभागी होण्याची परंपरा दरवेळी पार पाडली जाते. मात्र यावेळी निवडणुकीत सहभाग न घेता काँग्रेसचे नगरसेवक आणि त्यांना साथ देणारे अपक्ष उमेदवार मनपा सभागृहातून शपथ घेऊन बाहेर पडणार आहेत. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या एकंदर चुरशीबाबत संशय निर्माण झाला आहे.

भाजप तर्फे उमेदवारांची घोषणा होणार आणि भाजपचेच नगरसेवक त्यांना पाठिंबा देणार अशा प्रकारे महापौर निवडणूक होणार की काय असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. महानगरपालिका सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याची गरज असते. काँग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेता कुणाला करायचे याचा निर्णय येत्या दोन दिवसात होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेता ठरणार आहे. त्या विरोधी पक्षनेता आणि एकंदर नियोजित राजकारणाला किती अपक्ष साथ देतात यावरून विरोधी पक्षाच्या दृष्टीने त्यांचे भवितव्य ठरणार असून काँग्रेसने यावेळी स्वतंत्रपणे आपले विचार जर नेण्याचा निर्णय घेतला आहे.

 belgaum

यापूर्वी भाषिक मुद्द्यावर होणारी निवडणूक यावेळी पक्ष मुद्द्यावर झाली असल्याने आता पक्षीय राजकारणाचे चित्र बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात पाहायला मिळणार आहे. उमेदवार कोणीही असो तो भाजप पक्षाचा असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या एकाही नगरसेवकाला त्याच्यासाठी हात वर करता येणार नाही. कारण पक्षाच्या नियमांना ते चालणार नाही. यामुळे आपला उमेदवार नसल्यामुळे नगरसेवक पदाची शपथ घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

आता विरोधी पक्ष नेता कोण असणार हेही समजणे तितकेच महत्त्वाचे ठरले असून महापौराच्या एकंदर कामकाजाला योग्य कक्षेत आणण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. बेळगाव महानगरपालिका सभागृहात यापुढील काळात कोणत्या पद्धतीने राजकारण चालणार याचे संकेत आताच मिळू लागले आहेत.
एकीकडे भाजपने आपली सत्ता काबीज करून आपला महापौर निवडून आणण्याची पूर्ण तयारी केलेली असताना काँग्रेसचे दिग्गज नेते आता महानगरपालिकेच्या सभागृहावर लक्ष ठेवून राहणार असून त्यांचा विरोधी पक्ष नेता आणि त्यांची भूमिका यावर बेळगावच्या विकासाचे गणित ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.