महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यापासून सीमाभागातील कर्नाटकी नेतेच नव्हे तर पोलिसांची टाळकी देखील सरकल्याचा प्रत्यय नुकताच खानापुरातील दोन युवकांना आला. जेंव्हा हत्तरगी टोलनाक्यावर मराठीचा पोटशूळ असणाऱ्या पोलिसांनी त्यांना कर्नाटकचे खाता आणि मराठी का बोलता? असा सवाल करत बेदम मारहाण केली, तसेच त्यांच्याकडील 4000 रुपये हडप केले. या प्रकारामुळे सध्या सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील दोन युवक दुचाकीवरून आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी संकेश्वरमार्गे गडहिंग्लजला गेले होते. औषध घेऊन ते परतीच्या मार्गावर असताना हत्तरगी टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना अडवले दारू पिऊन आलात असा कांगावा करत त्यांनी संबंधित युवकांची तपासणी आणि चौकशी केली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्या युवकांनी मराठीत उत्तर दिल्यामुळे पोलिसांचा पारा चढला. त्यांनी त्या युवकांना तुम्ही बेळगावात कोणती भाषा बोलता असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आम्ही मराठी बोलतो असे सांगितले. तेंव्हा खवळलेल्या पोलिसांनी त्यांना दमदाटी करत मारहाण तर केलीच शिवाय कर्नाटकात राहतात तेंव्हा मराठी का बोलत नाही? असे धमकावले. फक्त मारहाण व धमकावून गप्प न बसता पोलिसांनी त्या युवकांच्या खिशात असलेले रोख 4 हजार रुपये देखील काढून घेतली.
दरम्यान सदर प्रकार उघडकीस येताच सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असून सोशल मीडियावर कर्नाटक पोलिसांच्या या कृतीचा धिक्कार केला जात आहे.