बेळगाव लाईव्ह :शासकीय योजनेअंतर्गत एखादे काम पटकन होण्याची शक्यता फार कमी असते. आता प्रगत डिजिटल युग आले असले तरी सर्व कामे ‘सर्व्हर’वर अवलंबून असल्यामुळे सर्व्हर डाऊन झाला की कामाची बोंबाबोंब होऊन डोक्याला हात लावण्याची वेळ येते.
सध्या हीच परिस्थिती अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात अनुभवायला मिळत आहे.
राज्य सरकारने शिधापत्रिकेसाठी नवी वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून नावे दुरुस्ती आणि शिधापत्रिकेत नव्या सदस्यांची नावे जोडण्याचे काम केले जाते.
मात्र सध्या शहरातील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयातील शिधापत्रिकांची वेबसाईट ओपनच होत नाही आहे. सर्व्हर डाऊनमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
शिधापत्रिकेतील नावाची दुरुस्ती आणि नवीन नावे जोडण्यासाठी 18 ते 21 ऑगस्ट हा कालावधी आणि वेळ दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत अशी देण्यात आली आहे. तथापि कालपासून सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवल्यामुळे हातातली कामे सोडवून शिधापत्रिकेच्या कामासाठी गेलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे.
काल काही मोजक्या लोकांचे काम झाल्यानंतर आज दिवसभरात एकाही शिधापत्रकाधारकाचे काम झाले नसल्यामुळे शिधापत्र नांव दुरुस्ती आणि नवीन नावे जोडण्याच्या या सुविधेचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.