यंदा वरूण राजाने उशिरा का होईना बेळगावकरांवर कृपा केल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप धरण तुडुंब भरले आहे. त्यासाठी जलाशयाच्या ठिकाणी आयोजित गंगापूजनाचा कार्यक्रम आज मंगळवारी सकाळी महापौर शोभा सोमनाचे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यंदाच्या पंचवार्षिक काळातील अखेरचे गंगापूजन करण्याचे भाग्य आज महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आणि आयुक्त अशोक दुडगुंटी यांना लाभले. त्यांच्या हस्ते आज मंगळवारी राकसकोप धरण क्षेत्रात विधीवत गंगापूजन करण्यात आले. धरण शंभर टक्के भरल्याने महापौर सोमनाचे, उपमहापौर पाटील व आयुक्त दुडगुंटी यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने धरणाला साडी-चोळी, श्रीफळ, फुल अर्पण करून विधीवत हे गंगापूजन झाले.
बेळगावकरांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळू दे, रोगराई टळू दे, असे साकडे यावेळी राकसकोप धरणाला घालण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक गिरीष धोंगडी, मंगेश पवार, सारीका पाटील, अभिजीत जवळकर, राजू भातकांडे, शिवाजी मंडोळकर, विरोधी पक्षनेते, नगरसेवक , कार्यकारी अभियंत्यांसह कर्मचारी उपस्थित होते.
बेळगाव शहराला प्रामुख्याने राकसकोप व हिडकल धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. राकसकोप धरण भरल्यानंतर दरवर्षी धरणाच्या ठिकाणी जाऊन महापौरांच्या हस्ते गंगापूजन केले जात असते.
एकेकाळी बेळगाव हे नगरपंचायत होते, तेंव्हापासून ही गंगापूजनाची परंपरा अखंडीत चालू आहे. सुरूवातील पावसाने ओढ दिल्याने तळाला गेलेला जलसाठा लक्षात घेऊन बेळगावकरांसाठी पाणीकपात करण्याची वेळ महापालिकेवर ओढावली होती.
परंतू शेवटच्या टप्प्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने राकसकोप धरण तुडूंब भरले आहे. यावर्षी या धरणातून मार्कंडेय नदीत दोन वेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीला एकदा पूरही आला होता.
बेळगाव महापौर उपमहापौरांनी केलं राकसकोप्प जलाशयात गंगा पूजन pic.twitter.com/1viKJ6kAMk
— Belgaumlive (@belgaumlive) August 1, 2023