बेळगाव लाईव्ह :बदली आदेश प्राप्त खानापूर तालुक्यातील शिक्षकांना त्यांच्या जागी पर्यायी शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतरच बदलीच्या ठिकाणी जाण्यास अनुमती द्यावी. तसेच सरकारी कार्यालयांसह बसेसच्या नाम फलकांवर मराठी भाषेचा अंतर्भाव केला जावा, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी सह जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे यांच्याकडे केली आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई आणि माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागण्यांची निवेदन आज शनिवारी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना सादर करण्यात आले. निवेदनांचा स्वीकार करून मंत्र्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. खानापूर समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची ही भेट घेतली आणि वरील मागण्याची पूर्तता करा अशी मागणी केली.शिक्षण खात्याने अलीकडेच जिल्हा व तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्यांचे सत्र हाती घेतले आहे.
सध्याच्या घडीला खानापूर तालुक्यातील शाळांची संख्या लक्षात घेता त्याच्या तुलनेत मराठी शिक्षकांची संख्या अतिशय अल्प आहे. सरकारच्या धोरणानुसार अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारांचा अनुशेष भरून (बॅक लॉग) काढण्याचा परिणाम खानापूर तालुक्यातील शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होण्यामध्ये झाला आहे. तालुक्यात आधीच शिक्षकांची कमतरता आहे. तेंव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यायी शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत बदली आदेश मिळालेले शिक्षक बदलीच्या ठिकाणी न जाता सध्या आहे त्या ठिकाणीच कार्यरत राहतील अशी व्यवस्था करावी. विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि शाळांच्या हिताच्या दृष्टीने आमच्या या विनंतीची तात्काळ अंमलबजावणी केली जावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील एका निवेदनात नमूद आहे.
दुसऱ्या निवेदनात तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, सरकारी दवाखाना, वन खात्याचे कार्यालय आदी सरकारी कार्यालयांवरील तसेच बस गाड्यांवरील फलक मराठीत असावेत अशी मागणी करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील जनता ही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मराठी व्यतिरिक्त इतर भाषांचे प्राथमिक ज्ञानही नाही. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून खानापूर येथे सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी अथवा बस स्थानकावर येणाऱ्या कन्नड व इंग्रजी भाषा अवगत नसलेल्या तालुक्यातील जनतेची कुचंबना होण्याबरोबरच मोठी गैरसोय होत आहे.
त्याकरिता सरकारी कार्यालयांवरील तसेच बस गाड्यांवरील नाम फलक कन्नड बरोबरच मराठी भाषेतही लिहल्यास मोठी मेहरबानी होईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. सदर निवेदन सादर करतेवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई आणि माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, प्रकाश चव्हाण,गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, संजीव पाटील, रणजित पाटील, कृष्णा कुंभार, हणमंत मेलगे,तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनाही धाडण्यात आली आहे.