केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली येथे कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ अथक परिश्रम घेणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी नुकतीच महत्त्वाची बैठक केली.
सदर तीन तासाच्या बैठकीत शाह यांनी बेळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडी जाणून घेण्याबरोबरच या भागात भाजप उमेदवार जास्तीत जास्त संख्येने विजयी होण्यासाठी जारकीहोळी यांच्या सहकार्याने रणनीती आखल्याचे कळते.
या बैठकीदरम्यान रमेश जारकीहोळी यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून आगामी निवडणुकीत भाजपच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्यास, योजना अंमलात आणण्यास संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.
बैठकीत जारकीहोळी यांनी बेळगावमधील राजकीय घडामोडी आणि भाजप नेत्यांकडून राबविण्यात येत असलेल्या पक्षाच्या उपक्रमांबाबत तसेच बेळगाव जिल्ह्यात पुन्हा भाजपचा ध्वज फडकविण्यासाठी आवश्यक असलेल्या रणनीतीची माहिती अमित शाह यांना दिली. मागील वेळी कर्नाटका भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी रमेश जारकीहोळी यांनी पार पडलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची जाणीव असल्यामुळे शाह यांनी प्रचंड विश्वास दाखवत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
रमेश जारकीहोळी यांनी देखील उत्साहाने ही जबाबदारी स्वीकारली असून शहा यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपला विजयी करण्यासाठी कटिबद्धता दर्शविली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यातील या बैठकीमुळे राजकीय उत्सुकता आणि अपेक्षेची ठिणगी पडली आहे.