Thursday, March 28, 2024

/

विधानसभा निवडणुकीत अधिकाऱ्यांनी दक्षता बाळगावी : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. बेळगाव जिल्ह्यातील अठरा मतदान केंद्रांवर एकूण २३ हजारांहून अधिक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व नोडल अधिकारी व पथकांनी तयारी करावी, निवडणूक कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कुचराई होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले.

सुवर्ण विधानसौध येथे शनिवारी निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी आणि विविध संघांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.

बेळगाव हा सीमावर्ती जिल्हा असल्याने निवडणुकीच्या काळात राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये रोख रक्कम व दारूसह विविध प्रकारच्या वस्तूंची अवैध वाहतूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेक पोस्टवर अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

 belgaum

फ्लाइंग स्क्वॉड टीम (FST), स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (SST), व्हिडिओ वीव्हिंग टीम (VST) सह सर्व टीमने कोणत्याही प्रकारची बेकायदेशीरता किंवा नैतिकतेच्या आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास त्वरित प्रतिसाद द्यावा. 24 तास चालणाऱ्या कामकाजासाठी तीन शिफ्टमध्ये टीम्स तैनात केल्या जातील. अनुचित घटनेची किंवा प्रकरणाची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी करावी, व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर योग्य कागदपत्रांसह गुन्हा दाखल करावा.

या पथकांना आवश्यक ते अधिकार व साधने पुरविली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. याचप्रमाणे निवडणूक कर्तव्य पार पाडताना नि:पक्षपातीपणे पार पाडावे. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.Dc meeting

यावेळी बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांनीही महत्वपूर्ण सूचना आणि माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, सीमा तपासणी नाक्यांवर तैनात असलेल्या पथकांनी प्रत्येक वाहनाची काटेकोरपणे तपासणी करावी. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू, साड्या, घरगुती वस्तू किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाचे वाटप असे प्रकार आढळल्यास तैनात करण्यात आलेल्या पथकाने तत्काळ तपास घेऊन वस्तू जप्त करून गुन्हा दाखल करावा, असे निर्देश दिले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांनी, निवडणूक कर्तव्यात व्यस्त असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र परिधान करावे, अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील, चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी माधव गीते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचे रिटर्निंग अधिकारी, विविध समित्यांचे नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी, फ्लाइंग स्क्वॉड (एफएसटी), स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (एसएसटी), व्हिडीओ वीव्हिंग टीम (व्हीएसटी) पथके, अधिकारी, पोलीस, उत्पादन शुल्क, महसूल आदी विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.