बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील भाग्यनगर येथे कार्यरत असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप समोर आल्यानंतर, संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांची तपासणी आणि छापेमारीची कारवाई शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. यावेळी कंपनीचे कार्यालय सील करण्यात आले.
बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कंपनीच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन कागदपत्रे, गुंतवणूकदारांची माहिती तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. कार्यालय सील करण्याची प्रक्रिया सुरू होताच काही महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. कार्यालयाबाहेर आशेने प्रतीक्षा करणाऱ्या ठेवीदारांनाही भावनिक होत अश्रू आवरता आले नाहीत.
भाग्यनगर येथील मुख्य कार्यालयात सुमारे ७२ कर्मचारी कार्यरत असून, गेल्या दोन दिवसांपासून अधिकारी कर्मचाऱ्यांकडून माहिती संकलित करत आहेत. आवश्यकतेनुसार चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, कंपनीविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. दोन दिवसांच्या तपासणी व छापेमारीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कार्यालय सील करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी अधिकारी पुढाकार घेत आहेत.
या प्रकरणात BUDS (Banning of Unregulated Deposit Schemes) कायदा आणि KPID कायदा अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.




