belgaum

बेळगावच्या आशिष भोगाणेंना आयबीएम गोल्डन सर्कल पुरस्कार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या शास्त्रीनगर परिसरातील आशिष बाबुराव भोगाणे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘आयबीएम गोल्डन सर्कल-2026’ पुरस्कार पटकावला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी येथे 4 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार आयबीएम कंपनीकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी आयबीएमने भारतातील सर्वोत्तम सहा कर्मचाऱ्यांची निवड केली होती. त्यामध्ये बेळगावचे आशिष भोगाणे यांची निवड होणे ही शहरासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

सध्या बेंगळुरू येथील आयबीएम कंपनीत कार्यरत असलेल्या आशिष भोगाणे यांनी कंपनीच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) विभागात ‘ग्रोथ अॅक्सिलरेटर्स’ या उपक्रमांतर्गत उल्लेखनीय योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि परिणामकारक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला.

 belgaum

आशिष यांचा शैक्षणिक प्रवासही प्रेरणादायी ठरला आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण सेंट झेविअर्स हायस्कूल, बेळगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर मराठा मंडळ पॉलिटेक्निक, बेळगाव येथून डिप्लोमा शिक्षण घेतले. पुढे जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून अभियांत्रिकी पदवी संपादन करून त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

या यशाबद्दल आयबीएम कन्सल्टिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष Mohamed Ali यांनी आशिष भोगाणे यांचे विशेष अभिनंदन केले. “वेग, मालकी हक्क, विज्ञान आणि खुलेपणा या मूल्यांचे तुम्ही उत्कृष्ट प्रदर्शन केले असून त्यातून मोठा सकारात्मक बदल घडवून आणला आहे. तुमच्या या कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन,” अशा शब्दांत त्यांनी आशिष यांच्या कार्याची प्रशंसा केली.

आशिष भोगाणे हे शास्त्रीनगर येथील प्रतिष्ठित नागरिक बाबुराव भोगाणे यांचे सुपुत्र असून त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे बेळगावसह संपूर्ण राज्यातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आयटी क्षेत्रात जागतिक स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आशिष भोगाणे यांच्या या यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.