बेळगाव लाईव्ह : सहकार क्षेत्रातील पारदर्शकता टिकवण्यासाठी आणि आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी ‘कृतीशील मराठा समाजा’ची एक महत्त्वपूर्ण बैठक बेळगाव येथे पार पडली. या बैठकीत बेळगावातील मराठा सहकारी बँकेमधील वाढता अनावश्यक खर्च, चुकीच्या पद्धतीची नोकरभरती आणि १० वर्षांचा कार्यकाळ संपूनही पदावर कायम असलेल्या संचालकांच्या भूमिकेवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.
या बैठकीत बोलताना अमित देसाई यांनी मराठा सहकारी बँकेतील भोंगळ कारभारावर बोट ठेवले. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्या संचालकांची १० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी तात्काळ पायउतार होणे गरजेचे असतानाही बँकेत पदाचा मोह सोडला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. बँकिंग क्षेत्रात खर्चात कपात करण्याचे आदेश असताना, १० लाखांचे रिनोव्हेशनचे काम थेट २६ लाखांवर नेऊन मराठा सहकारी बँकेला आर्थिक अडचणीत आणले जात आहे. तसेच, वशिल्याच्या तत्त्वावर तब्बल ३७ जणांची बेकायदेशीर नोकरभरती करण्याचा प्रयत्न सुरू असून, या सर्व भ्रष्टाचाराविरोधात आम्ही ‘अँटी करप्शन ब्युरो’कडे (ACB) रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
दत्ता जाधव यांनी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत मराठा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर सडकून टीका केली. आरबीआयच्या नियमानुसार १० वर्षे पूर्ण झालेल्या संचालकांनी तात्काळ पद सोडून ३ वर्षांचा ‘कूलिंग ऑफ पिरियड’ पाळणे सक्तीचे आहे. असे असतानाही, बँकेच्या संबंधित संचालकांनी नियम डावलून अवघ्या काही दिवसांत ७ बेकायदेशीर बोर्ड मिटिंग्ज घेतल्या आणि त्याचा भत्ता लाटला. हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून जनरल मॅनेजर आणि सभासदांनी यावर तात्काळ जाब विचारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत अत्यंत आक्रमक भूमिका मांडताना शरद पाटील यांनी विशिष्ट संचालकांच्या मक्तेदारीवर प्रहार केला. काही नापसंत आणि वादग्रस्त व्यक्तींमुळे संपूर्ण संस्था आणि समाज बदनाम होत असून, त्यांना तात्काळ संचालक पदावरून बाहेर काढले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा सहकारी बँकेच्या १० हजार सभासदांपैकी वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ ठराविक लोकच येतात आणि सर्वसामान्य गल्ल्यांमधील मतदारांची नावे जाणीवपूर्वक उडवली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. वारसदारांना दोन-दोन वर्षे हेलपाटे घालायला लावणारा हा कारभार आता खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.
मराठा सहकारी बँकेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि गरीब मराठा मुलांच्या शैक्षणिक कर्जाचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा लढा उभारण्यात आला आहे. त्यामुळे पंचमंडळ, ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा कायदेशीर चौकटीत राहून तीव्र संघर्ष केला जाईल, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी चंद्रकांत कोंडुसकर नारायण अष्टेकर यांच्यासह मराठा समाजातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




