बेळगाव लाईव्ह: कारगिल विजय दिनाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MARATHA LIRC) येथे युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
१९९९ मधील कारगिल युद्धात शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेचे अद्वितीय उदाहरण घालून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या वीर सैनिकांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले.
युद्धस्मारकावर ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, एसएम, व्हीएसएम, कमांडंट, मराठा LIRC, सुबेदार मेजर संदीप खोत आणि अग्निवीर विवेक खेडेकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या माध्यमातून रेजिमेंटच्या शौर्यपरंपरेचा गौरव करत देशसेवेची प्रेरणा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने पोहोचत असल्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी कारगिल युद्धात मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटच्या जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याची आठवण करून देण्यात आली. त्यांच्या पराक्रमामुळे रेजिमेंटचे नाव भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले असल्याचे नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी, ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी (JCO), इतर सैनिक तसेच अग्निवीर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कारगिलमधील शहीद वीरांना अभिवादन करत भारतीय लष्कराच्या सर्वोच्च परंपरा जपण्याचा आणि देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला.





