बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच, देशव्यापी बँक संपामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधीच दुसरा शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्या आल्याने बँकिंग सेवा विस्कळीत होणार होत्या; त्यातच कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना आता सणाच्या खरेदीसाठी आणि दैनंदिन व्यवहारांसाठी रोकड मिळवणे कठीण झाले असून, एटीएमच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.
५ दिवसांच्या कार्यकाळाची अंमलबजावणी रखडली
आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी सरकारने दोन वर्षांपूर्वीच मान्य केली होती, परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असा आरोप युनियनचे अध्यक्ष मुरलीधर करजगी यांनी केला. सरकारच्या या टाळाटाळीच्या धोरणामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) वितरणातील भेदभाव हा आंदोलनाचा दुसरा मुख्य मुद्दा आहे. बँक ऑफ बडोदाचे प्रतिनिधी प्रसन्न शेट्टी यांनी सांगितले की, २०२४ मध्ये मंजुरी मिळूनही कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी आणि उच्च अधिकाऱ्यांना जास्त इन्सेंटिव्ह देणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. ही असमानता दूर करून सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
बेळगावात कर्मचाऱ्यांचे भव्य शक्तिप्रदर्शन
आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव येथे बँक कर्मचाऱ्यांनी भव्य निषेध मोर्चा काढला. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली आणि समादेवी गल्ली मार्गे पुन्हा संभाजी चौकात आला. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा सर्व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.





