belgaum

खरेदीसाठी गर्दी; अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने बेळगाव शहरातील बाजारपेठांमध्ये गणपतीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरासह बाहेरगावातूनही नागरिक मोठ्या संख्येने बेळगावात दाखल होत आहेत. त्यामुळे प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे.

मात्र, या गर्दीमध्ये बाजारपेठेच्या परिसरात अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होत आहे. पांगुळ गल्ली कॉर्नर, भेंडी बाजार कॉर्नर तसेच आसपासच्या प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अरुंद रस्ते, मोठ्या प्रमाणातील नागरिकांची गर्दी आणि त्यातच बाजारपेठेत थांबणारी मोठी वाहने यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बेळगावची बाजारपेठ वर्षातील सर्वाधिक गजबजलेल्या बाजारपेठांपैकी एक असते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातूनही मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी बेळगावात येतात. त्यामुळे उद्या बाजारपेठेतील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 belgaum

या पार्श्वभूमीवर मारुती गल्ली, गणपती गल्ली, पांगुळ गल्ली आणि रविवार पेठ परिसरात किमान एक दिवस अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ट्राफिक पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवून अवजड वाहनांचे नियमन करणे गरजेचे आहे.

गणेशभक्तांना खरेदी करताना अडथळा निर्माण होऊ नये आणि वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी ट्राफिक प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.