बेळगाव लाईव्ह : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आणि चांगले आचरण राखणाऱ्या कैद्यांना नियमानुसार वेळेपूर्वी मुक्त होण्याची संधी मिळू शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सरकारच्या निर्देशानुसार दीर्घकालीन शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या प्रकरणांचा दर महिन्याला आढावा घेतला जातो. यामध्ये कैद्याचे आचरण, चारित्र्य तसेच त्याने वारंवार पॅरोलचा लाभ घेतला आहे का, यासह विविध बाबींचा विचार केला जातो.
१४ वर्षांची शिक्षा पूर्ण केलेले पुरुष कैदी आणि १० वर्षांची शिक्षा पूर्ण केलेल्या महिला कैद्यांना, त्यांनी वारंवार पॅरोल घेतलेला नसल्यास आणि कारागृहातील वर्तन चांगले असल्यास, नियमानुसार वेळेपूर्वी मुक्ततेसाठी विचार केला जाऊ शकतो.
कैद्यांच्या वर्तनाचा आणि संबंधित निकषांचा नियमित आढावा घेऊन पात्र प्रकरणांवर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





