belgaum

साप सोडताना काळाचा घाला!सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील सर्पमित्र बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार (वय 39) यांचा सर्पदंशाने मंगळवारी (6 ऑक्टोबर) दुर्दैवी मृत्यू झाला. सापाला पकडल्यानंतर जंगलात सोडण्यासाठी गेले असताना सापाने त्यांच्या हाताला दंश केला. या घटनेने इदलहोंडसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विठ्ठल सुतार हे गेल्या सुमारे दहा वर्षांपासून साप पकडण्याचे काम करीत होते. परिसरातील नागरिकांच्या घरात किंवा अन्य ठिकाणी साप आढळल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडत असत. त्यानंतर पकडलेला साप पोत्यात ठेवून जंगलात नेऊन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम ते करीत होते.

मंगळवारी एका ठिकाणी साप पकडल्यानंतर तो जंगलात सोडण्यासाठी सुतार गेले होते. जंगलात पोहोचल्यानंतर सापाला सोडण्यासाठी त्यांनी पोत्याचे तोंड उघडले. यावेळी अचानक सापाने पलटी मारून त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंश होताच ते जागीच कोसळले.

 belgaum

विशेष म्हणजे, साप जंगलात सोडण्यासाठी जाताना सुतार नेहमी कोणाला तरी सोबत घेऊन जात असत. मात्र, यावेळी ते एकटेच गेले होते.

बराच वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ते जंगल परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच इदलहोंड येथील माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव आण्णाबाळ दिगंबरराव पाटील यांनी गणेबैल टोलनाक्याजवळील राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णवाहिका तातडीने बोलावून घेतली.

रुग्णवाहिकेतून सुतार यांना उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विठ्ठल सुतार यांच्या पश्चात पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

दरम्यान, या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. बेळगाव येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीराम सेना शाखेकडून श्रद्धांजली

बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार हे श्रीराम सेना संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. साप पकडण्याच्या कामात ते तरबेज असल्याने परिसरातील नागरिकांना अनेकदा त्यांची मदत मिळत होती. त्यांच्या निधनामुळे श्रीराम सेना इदलहोंड शाखेने एक सक्रिय कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त केली.

श्रीराम सेना इदलहोंड शाखेचे अध्यक्ष शंकर पाखरे तसेच पदाधिकाऱ्यांनी सुतार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीच्या काळात श्रीराम सेना इदलहोंड शाखा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे आश्वासन दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.