belgaum

बेळगावात आशा कार्यकर्त्यांचा मोर्चा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : समस्त ॲपमुळे वाढलेला कामाचा ताण, डेटा भत्त्यातील कपात आणि मानधनाच्या देयकातील गोंधळाचा निषेध करत बेळगावात आशा कार्यकर्त्यांनी बुधवारी मोर्चा काढला. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

राणी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आशा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. निश्चित मानधनात वाढ, ऑनलाइन ॲपद्वारे लादलेले अतिरिक्त काम आणि आरसीएच पोर्टलवरील देयकांच्या समस्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

पूर्वी देण्यात येणारा २५० रुपयांचा डेटा भत्ता कमी करण्यात आला असून, ऑनलाइन सर्वेक्षण, लसीकरणासह विविध कामांची नोंद करूनही त्यानुसार देयक मिळत नसल्याचे आशा कार्यकर्त्यांनी सांगितले. या समस्या सोडवण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हा सचिव गीता रायगोळ यांनी सांगितले.

 belgaum

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात १० हजार रुपये निश्चित मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच समस्त ॲपद्वारे मिळणारे मानधन वेळेवर मिळत नसून वेगवेगळ्या पद्धतीने जमा होत असल्याचा आरोप करण्यात आला. या समस्यांच्या निषेधार्थ बेळगाव जिल्ह्यातील सुमारे एक ते दोन हजार आशा कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्याचे अथणी तालुक्यातील मदभावी येथील सुरेखा विजय कांबळे यांनी सांगितले.

राज्यातील आशा कार्यकर्त्यांच्या विविध मागण्यांसाठी ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान आंदोलन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आशा कार्यकर्त्यांना दरमहा १५ हजार रुपये निश्चित मानधन द्यावे आणि बेंगळुरूत यापूर्वी दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. योग्य मोबाईल, पुरेसा डेटा आणि प्रशिक्षण न देता समस्त ॲपद्वारे ऑनलाइन काम करण्यासाठी दबाव आणू नये. तसेच तीन ते चार महिन्यांपासून प्रलंबित असलेली देयके नियमितपणे मिळण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी आशा संघाचे प्रमुख के. सोमशेखर यादगिरी यांनी केली.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारे प्रोत्साहनधन व मानधन एकत्र करून आशा कार्यकर्त्यांना दरमहा १५ हजार रुपये मानधन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी एआययुटीयुसीच्या नेतृत्वाखाली सरदार्स मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.मोर्चात मोठ्या संख्येने आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.