बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील भडांगे कॉलनीतील रहिवासी अजित वासुदेव पाटील (वय ६१) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अजित पाटील हे शेतातील पिकांना पाणी सोडण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्यात गंभीर त्रास झाल्याने ते वाटेतच बेशुद्ध पडले.
घटनेची माहिती शेजारील शेतकऱ्याने गावात दिल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अजित पाटील यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अजित पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेत परिसरात मधमाशांची पोळी किंवा त्यांची वस्ती आढळल्यास विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतीच्या कामासाठी जाताना अशा ठिकाणी अनावधानाने मधमाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेची दखल घेत एपीएमसी उत्पन्न बाजार समिती तसेच संबंधित प्रशासनाने लक्ष घालून अजित पाटील यांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही आता पुढे येत आहे.
अंत्यविधी आज सायंकाळी ४ वाजता दर्शन तलावानजीक, गावडे वैकुंठ धाम येथे होणार आहे.





