belgaum

महानगरपालिकेत महाजन अहवालाच्या ठराव मंजुरीवरून म. ए. समिती आक्रमक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेत महाजन कमिशनच्या अहवालाला पाठिंबा देणारा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाचा तीव्र निषेध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

महाजन कमिशनच्या अहवालाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी मराठी भाषिकांशी द्रोह केला आहे. मराठी जनतेच्या मतांवर निवडून येऊन त्यांनी मराठी माणसाचा गळा कापण्याचे काम केले आहे. जनतेने आता अशा नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांना थेट जाब विचारावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी केले.

दुसरीकडे, महानगरपालिकेत या ठरावाला तीव्र विरोध दर्शवून घोषणाबाजी करत सभात्याग करणाऱ्या तीन नगरसेवकांचे बैठकीत विशेष अभिनंदन करण्यात आले. या तीन नगरसेवकांनी यापूर्वीही महापालिकेत मराठी भाषिक आणि सीमाभागाच्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात आले.

 belgaum

येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या जाचक दिनासंदर्भात तसेच डिसेंबरमधील मेळाव्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. १ नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागण्यात येणार आहे. प्रशासनाने परवानगी नाकारली किंवा बंदी घातली तरीही सर्व बंदी हुसकावून लावून १ नोव्हेंबर रोजी निषेध फेरी काढलीच जाईल, असा ठाम निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर आदींसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.