बेळगाव लाईव्ह : पत्रकारितेच्या ‘PRESS’ नावाचा गैरवापर करत अॅक्टिव्हावरून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला सिसीबी पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या अॅक्टिव्हाच्या डिक्कीतून ४५ हजार रुपये किमतीचे मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. या कारवाईत स्कूटरसह एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
३ ऑक्टोबर रोजी सिसीबी विभागाचे पीआय मंजुनाथ नाईक यांना अमली पदार्थ विक्रीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने समर्थनगर, बळ्ळारी नाल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी छापा टाकला.
यावेळी सत्यम संतोष कावेटिया (२१, रा. शास्त्रीनगर, बेळगाव) हा तरुण अमली पदार्थाची विक्री करताना पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या होंडा अॅक्टिव्हाच्या डिक्कीत मेथॅम्फेटामाइन हा अमली पदार्थ आढळून आला.
विशेष म्हणजे, आरोपीने आपल्या अॅक्टिव्हावर ‘PRESS’ असे लिहून घेतले होते. पत्रकारितेशी संबंधित असल्याचे भासवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या उल्लेखाचा अमली पदार्थ विक्रीसाठी गैरवापर झाल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. मात्र, आरोपी प्रत्यक्षात कोणत्याही माध्यम संस्थेशी संबंधित आहे का, याबाबत पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात माहिती देण्यात आलेली नाही.

पोलिसांनी आरोपीकडून ४५ हजार रुपये किमतीचे मेथॅम्फेटामाइन आणि २० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा, असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२६ दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी) आणि २२(बी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईबद्दल सिसीबी पथकातील पीआय, पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.





