बेळगाव लाईव्ह : ‘बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन’च्या वतीने बेळगावात नागरिकांसाठी ‘कॉन्ट्रॅक्ट ब्रिज’ या जागतिक दर्जाच्या खेळाचे मोफत विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करून विचारांना योग्य दिशा देण्यासाठी हा खेळ अत्यंत उपयुक्त मानला जातो.
या खेळामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता, तार्किक विचार आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक उत्तम मानसिक व्यायाम ठरत असून सर्व वयोगटातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे सचिव एम. आय. हेगडे यांनी केले आहे.
हा खेळ जगातील बहुतांश देशांमध्ये खेळला जात असून त्याला भाषेचा कोणताही अडसर येत नाही. कोणत्याही लांडी-लबाडीला वाव नसल्याने याला ‘जेंटलमन्स गेम’ म्हटले जाते. खेळात नवशिके आणि उत्कृष्ट खेळाडू एकत्र खेळतात.
हातातील पानांच्या मूल्यापेक्षा त्यांचा वापर कसा केला जातो यावर विजय अवलंबून असतो. स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी प्रतिस्पर्ध्यालाही काही हक्क द्यावे लागतात, ही सहकार्याची शिकवण या खेळातून मिळते. प्रत्येक पानाची ताकद ही समूहाच्या ताकदीवर ठरत असल्याने संघटन कौशल्य वाढीस लागते.

हे प्रशिक्षण शिबीर टिळकवाडी येथील टिळकवाडी क्लबच्या ओल्ड लायब्ररी बिल्डींगमधील सेंट्रल हॉलमध्ये पार पडणार आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सायंकाळी ६:०० ते ७:०० या वेळेत दररोज १ तासाचे वर्ग घेतले जातील. प्रभावी मार्गदर्शनासाठी लहान गटांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.
या खेळाचे पूर्वज्ञान नसलेले महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त कर्मचारी यात सहभागी होऊ शकतात. इच्छुक नागरिकांनी संतोष के. मामलेलापूर (9449837145), एच. डी. कड्रोलकर (9845274931) किंवा डी. एम. पंडित (9448140726) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





