belgaum

गोकाक टेक्सटाईल्सचा मारिहाळ येथील गारमेंट युनिट कायमचे बंद

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील मारिहाळ येथील ‘गोकाक टेक्सटाईल्स लिमिटेड’चा गारमेंट विभाग (निटवेअर युनिट) ६ ऑक्टोबर २०२६ पासून कायमचा बंद करण्यात आला आहे. तीन दशकांपूर्वी सुरू झालेला हा उद्योग पूर्णपणे थांबल्यामुळे बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

कंपनीने औद्योगिक विवाद कायदा १९४७ आणि औद्योगिक संबंध संहिता २०२० अंतर्गत कामगार विभागाकडे अर्ज केला होता. मात्र, निश्चित मुदतीत विभागाकडून कोणताही निर्णय न आल्यामुळे कायद्यानुसार युनिट बंद करण्याची परवानगी गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार ६ ऑक्टोबरपासून सर्व कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली असून, कामगार कायद्यानुसार त्यांची थकीत रक्कम आणि भरपाई दिली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

१९९५ मध्ये मुख्यत्वे निर्यातीसाठी हा निटवेअर युनिट सुरू करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक बाजारातही उत्पादने विकली जात होती. परंतु २०१५-१६ मध्ये डाईंग आणि निटींगची मुख्य यंत्रसामग्री गोकाक फॉल्स येथील मुख्य मिलमध्ये हलवण्यात आली. त्यामुळे मारिहाळ येथील कारखान्यात केवळ कटिंग आणि स्टिचिंगचे काम सुरू होते.

 belgaum

उत्पादन खर्चात झालेली वाढ, जुनी झालेली यंत्रसामग्री, विजेची आणि पाण्याची समस्या, कामगारविषयक अडचणी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील मंदी या कारणांमुळे हे युनिट चालवणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाले होते, असे कंपनीने नमूद केले आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (BSE) दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात या युनिटकडून ४.२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. हा कंपनीच्या एकूण महसुलाचा ९.७६ टक्के भाग होता. मात्र, ३१ मार्च २०२६ पर्यंत या युनिटचे निव्वळ मूल्य उणे ४१.९३ कोटी रुपये (नेगेटिव्ह नेट वर्थ) झाले होते.

या युनिटची १५.६५ एकर जमीन, इमारत आणि यंत्रसामग्री विक्रीसाठी ९ सप्टेंबर २०२५ रोजी विजापूर येथील ‘मेसर्स व्ही. जी. पारख अँड कंपनी’सोबत करार करण्यात आला आहे. ही मालमत्ता १९.५० कोटी रुपयांना विकली जाणार असून, रिअल इस्टेट विकासासाठी ही जागा वापरली जाणार आहे. या निर्णयामुळे बेळगावच्या औद्योगिक पटलावरील १९९५ पासून कार्यरत असलेला एक मोठा कारखाना आता इतिहासजमा झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.