बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या कन्येने हिमालयातील अत्यंत आव्हानात्मक मोहिम पूर्ण करत एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डॉ. रमेश आणि डॉ. सावित्री दोड्डणावर यांची कन्या नेहा दोड्डणावर हिने २८ सप्टेंबर २०२६ रोजी नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचत आपल्या गिर्यारोहण प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला.
भारतेश कॉलेजमधून बीबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विवाहानंतर नेहा लंडनला स्थायिक झाली. याच काळात तिला गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. सुरुवातीला चॅरिटी वॉकपासून सुरू झालेला तिचा प्रवास पुढे विविध कठीण ट्रेक आणि पर्वत मोहिमांपर्यंत पोहोचला.
नेहाने ३० किलोमीटरचा Chiltern 3 Peaks, Yorkshire 3 Peaks, ४० किलोमीटरचा Surrey 3 Peaks, ३५ किलोमीटरचा South Coast Ultra Challenge आणि २५ किलोमीटरचा Thames Bridges Trek यांसारख्या आव्हानात्मक मोहिमा पूर्ण केल्या आहेत.
त्यानंतर वेल्समधील Snowdon, Cadair Idris आणि Tryfan तसेच Scafell Pike आणि Ben Nevis यांसारख्या पर्वतांवरही तिने चढाई केली. २०२४ मध्ये टांझानियातील ५,८९५ मीटर उंच माउंट किलीमांजारो आणि २०२५ मध्ये इजिप्तमधील २,६४२ मीटर उंच Mount St Catherine सर करत तिने आपल्या गिर्यारोहणाचा अनुभव अधिक समृद्ध केला.
१२ दिवसांत १३० किलोमीटरचा खडतर प्रवास
एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी नेहाने १२ दिवसांत सुमारे १३० किलोमीटरचा प्रवास केला. खुम्बू व्हॅलीमधील या मोहिमेत बदलते हवामान, मुसळधार पाऊस, हिमवृष्टी, कडाक्याची थंडी आणि बदलणाऱ्या ट्रेल परिस्थितीचा सामना करावा लागला.

उंची वाढत गेल्याने डोकेदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास आणि Acute Mountain Sickness यांसारख्या समस्यांनीही तिची परीक्षा घेतली. मात्र, या अडचणींवर मात करत तिने आपला प्रवास सुरू ठेवला.
अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे परिस्थिती आणखी कठीण झाली होती. खराब हवामानामुळे खुम्बू परिसर बंद करण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र, हवामानात सुधारणा झाल्यानंतर नेहा आणि तिच्या सहकाऱ्यांनी पुढील प्रवास सुरू ठेवत अखेर ५,३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला.
“पर्वत केवळ ताकदीने जिंकता येत नाहीत; त्यासाठी संयम, आदर आणि परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता आवश्यक असते,” असा अनुभव नेहाने व्यक्त केला.
एव्हरेस्ट बेस कॅम्प हे नेहासाठी अंतिम ध्येय नसून पुढील काळात ४,००० ते ६,००० मीटर उंचीच्या पर्वतांवर मोहिमा करण्यासोबतच scrambling आणि basic technical mountaineering कौशल्य विकसित करण्याचा तिचा मानस आहे.
चॅरिटी वॉकपासून हिमालयापर्यंतचा नेहाचा हा प्रवास जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी ठरला आहे.





