belgaum

जारकीहोळी ED धाडीत काय सापडलं? कशासाठी RAID?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित बेंगळुरू, बेळगाव, गोकाक आणि कोलकाता येथील २१ ठिकाणी ईडीने छापेमारी केली. ९ आणि १० सप्टेंबर रोजी करण्यात आलेली ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात FEMA अंतर्गत करण्यात आल्याचे ईडीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.

या कारवाईत सतीश जारकीहोळी यांची कन्या आणि चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, पुत्र राहुल जारकीहोळी तसेच मेहुणे वाय. डी. मंजुनाथ यांच्याशी संबंधित ठिकाणांचीही झडती घेण्यात आली. त्याचबरोबर मंत्री जारकीहोळी यांचे ओएसडी मलागौडा पाटील, राजू दरागशेट्टी, विठ्ठल प्रसन्नावर आणि डॉ. गिरीश सोनवळकर यांच्यासह काही निकटवर्तीयांच्या मालमत्ता आणि कार्यालयांवरही कारवाई करण्यात आली.

ईडीच्या म्हणण्यानुसार, जारकीहोळी कुटुंबाच्या अघोषित परदेशी गुंतवणुकी, सीमापार व्यावसायिक संबंध आणि कथित आर्थिक अनियमितता यांचा तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी आफ्रिकेतील विविध परदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी घेतल्याचे तपासात समोर आल्याचा दावा ईडीने केला आहे.

 belgaum

यामध्ये काँगोमधील Eldorado Mining Resources आणि झांबियातील Nava Aurum Mining Ltd यांसह इतर परदेशी संस्थांचा समावेश असल्याचे ईडीने नमूद केले आहे. तसेच सतीश जारकीहोळी यांचा काँगोमधील सोन्याच्या खाण व्यवसायाशी संबंधित Magnitude Star SARL या कंपनीत जवळपास ४० टक्के हिस्सा असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे सापडल्याचा दावा ईडीने केला आहे.

झडतीदरम्यान ३.३ कोटी रुपयांची बेहिशेबी भारतीय रोकड तसेच सुमारे १५ लाख रुपये मूल्याची अमेरिकी डॉलर, युरो आणि इतर परकीय चलन जप्त करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. काँगोमधील एका संस्थेत अनधिकृत माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोख गुंतवणूक अथवा खर्च केल्याचे पुरावेही मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित अनियमितता आणि कंत्राटदारांकडून लाचवसुलीशी संबंधित कागदपत्रांचाही तपास करण्यात आला. भारत वाणिज्य ईस्टर्न प्रायव्हेट लिमिटेड (BVEPL) या खासगी कंपनीने पीडब्ल्यूडी विभागातील कंत्राट मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच दिल्याचा आरोप असल्याचे ईडीने पत्रकात म्हटले आहे. या कथित लाचेचा पैसा परदेशातील मालमत्ता किंवा गुंतवणूक मिळवण्यासाठी वापरल्याचा संशयही तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

या कारवाईत परदेशी कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. वाय. डी. मंजुनाथ यांच्या नियंत्रणातील संस्थांच्या खात्यांमध्ये कंत्राटदारांकडून लाच गोळा केल्यासंदर्भातील पुरावे मिळाल्याचाही दावा ईडीने केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.