belgaum

गणेशोत्सवाच्या खरेदीला गर्दीचा तडका; आंदोलनांमुळे शहरात चक्काजाम

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे बेळगाव शहरात खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच, दुसरीकडे प्रशासकीय नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरात विविध विकासकामांच्या नावाखाली झालेली खोदाई, गल्लोगल्ली उभारलेले गणेशोत्सवाचे मंडप आणि त्यातच वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

या वाहतुकीच्या दुष्काळात शुक्रवारी राणी चन्नम्मा चौकात आंदोलनांचा सुकाळ पाहायला मिळाला असून, आंदोलनामुळे झालेल्या चक्काजाममुळे संपूर्ण बेळगाव शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती.

सध्या बेळगाव शहर आणि परिसरात ठिकठिकाणी विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. एल अँड टी कंपनीसह इतर यंत्रणांनी रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदाई करून ठेवल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच शहरात ३५० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असल्याने गल्लोगल्ली गणेशोत्सवाचे मंडप उभारण्यात आले असून, यामुळे अनेक अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

 belgaum

येत्या सोमवारी श्रींचे आगमन होत असल्याने, शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांचा मुहूर्त साधून नागरिक आजपासूनच खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. स्थानिक नागरिकांसह महाराष्ट्र आणि गोव्यातूनही मोठ्या संख्येने भाविक बेळगावच्या मुख्य बाजारपेठेत दाखल झाले आहेत.

शुक्रवारचा दिवस राणी चन्नम्मा चौकात आंदोलनांचा दिवस ठरला. चौकात एकापाठोपाठ एक आंदोलने सुरू झाल्याने आणि आंदोलनामुळे झालेल्या चक्काजाममुळे सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सदाशिवनगर, धर्मवीर संभाजी चौक, काकती वेस तसेच जिल्हाधिकारी कार्यालय मार्गाने चन्नम्मा चौकाकडे येणाऱ्या वाहनांचा पुरता खेळखंडोबा झाला.

आंदोलनांमुळे पोलिसांनी वाहतूक वेगवेगळ्या मार्गांवर वळवली खरी, पण यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून त्या रस्त्यावर विनाकारण फेऱ्या मारत भुर्दंड सोसावा लागला.

दुसरीकडे पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार आणि मारुती गल्ली या प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, पूजा आणि सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. अशा अत्यंत गर्दीच्या रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांना मोकळा प्रवेश दिल्यामुळे पादचाऱ्यांना साधे चालणेही कठीण झाले आहे.

त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत दुतर्फा पार्किंग करण्यात आल्याने कोंडीत भर पडत आहे. ऐन सणाच्या काळात बाजारपेठेत रहदारी पोलीस नियुक्त करणे अत्यंत गरजेचे असताना पोलीस प्रशासनाला याचा विसर पडल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाकी नऊ येत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.