बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बेळगावात काँग्रेसच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली.
राणी चन्नम्मा चौकात एकत्र आलेल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि ईडी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने करत परिसर दणाणून सोडला. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष ठामपणे उभा असून, कोणत्याही दडपशाहीला न घाबरता लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी या वेळी दिला.
विरोधी पक्षांना त्रस्त करण्यासाठीच केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. चौकशीच्या बहाण्याने जारकीहोळी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असे सांगत राजासलीम काशम्मनवर यांनी सतीश जारकीहोळी हे वंचित व शोषितांचे खंबीर पाठीराखे असल्यानेच त्यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई केली जात असल्याचे नमूद केले.
जारकीहोळी हे नाव महाराष्ट्रासह कर्नाटकात एक भक्कम शक्ती असून, त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे; परंतु अशा शेकडो कारवायांना सामोरे जाण्याची ताकद पक्षात आहे, असे स्पष्ट करत आयेशा सनदी यांनी भाजपच्या भ्रष्ट नेत्यांवर ईडी धाडी का घालत नाही, असा थेट सवाल केला.

सतीश जारकीहोळी यांच्याकडे सर्व व्यवहारांचे कायदेशीर पुरावे असून ते कोणत्याही चौकशीला घाबरत नाहीत. येत्या निवडणुकीत राज्यात पुन्हा विजय मिळवून केंद्रातील सत्ताही उलथवून लावू, असा ठाम विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.
या निदर्शनांमध्ये काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज शेग्गावी, अरविंद कारची, बाबूलाल, रोहिणी, विनय नावलगट्टी, फरीदा, परशुराम मुग्गनवर, दिलशाद, ‘काडा’ अध्यक्ष युवराज कदम, तळवार, महादेवी तळवार, राणी बी. पी., लता माणे, सलीम कत्तीब, जयश्री माळगी, दिनेश नाशीपुडी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





