बेळगाव लाईव्ह : पायांना सूज येणे (Pedal Oedema) ही किरकोळ समस्या नसून, ती हृदय, मूत्रपिंड, यकृत, थायरॉईड किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. त्यामुळे घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत बेळगावच्या होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले.
डॉ. सरनोबत यांनी सांगितले की, पायांना येणारी सूज प्रामुख्याने पिटिंग एडेमा आणि नॉन-पिटिंग एडेमा अशा दोन प्रकारची असते. बोटाने दाबल्यावर त्वचेवर खड्डा पडत असल्यास त्याला पिटिंग एडेमा म्हणतात. हा प्रकार हृदय, यकृत, मूत्रपिंडाचे विकार, रक्ताची कमतरता किंवा काही गंभीर आजारांशी संबंधित असू शकतो. तर दाबल्यानंतर खड्डा न पडणारी सूज नॉन-पिटिंग एडेमा असून ती लिम्फॅटिक प्रणालीतील अडथळे किंवा हायपोथायरॉईडीझममुळे दिसून येते.
याशिवाय संधीवात, लिव्हर सिरोसिस, क्रॉनिक किडनी डिसीज, नेफ्रोटिक सिंड्रोम, शरीरातील प्रथिनांची कमतरता, व्हेरिकोज व्हेन्स, गर्भावस्था, काही औषधांचे दुष्परिणाम तसेच दीर्घकाळ उभे किंवा बसून राहणे ही देखील पाय सुजण्याची कारणे असू शकतात.

एका पायाला अचानक सूज, लालसरपणा आणि उष्णता जाणवत असल्यास ते डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) चे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पायांची सूज वारंवार येत असल्यास रक्त तपासणी, हृदय, मूत्रपिंड आणि यकृताच्या आवश्यक चाचण्या करून सुजेमागील मूळ कारण शोधणे गरजेचे आहे. केवळ सूज कमी करण्यापेक्षा मूळ आजारावर उपचार करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे डॉ. सरनोबत यांनी स्पष्ट केले.
होमिओपॅथी उपचारांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेची आवश्यकता नसलेल्या अनेक रुग्णांमध्ये होमिओपॅथी ही वैयक्तिक लक्षणे आणि मूळ कारणांचा सखोल अभ्यास करून उपचार करणारी प्रभावी उपचारपद्धती ठरू शकते. मात्र कोणतेही होमिओपॅथिक औषध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
डॉ. सरनोबत यांनी जीवनशैलीतही काही बदल करण्याचे आवाहन केले आहे. मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, नियमित चालणे व हलका व्यायाम करणे, दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळणे, विश्रांती घेताना पाय उंच ठेवणे तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजारांवर नियमित नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पायांची सूज ही साधी समस्या समजून दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास अनेक गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकतात, असा संदेश डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिला.
सल्ला व उपचारासाठी संपर्क
डॉ. सोनाली सारनोबत
होमिओपॅथिक तज्ज्ञ
केदार क्लिनिक
फुलबाग गल्ली, बेळगावी
📞 99649 46918
डॉ. सारनोबत क्लिनिक
गोवावेस, बेळगाव
📞 99161 06896





