बेळगाव लाईव्ह : केवळ व्यासपीठावर टाळ्या मिळवण्यासाठी लिहिलेली कविता अल्पजीवी ठरते. अनुभवांचे चैतन्य जपणारी, वाचकाच्या अंतर्मनाला भिडून त्याला अस्वस्थ करणारी आणि अर्थाचे विविध पदर उलगडणारी कविता हीच खरी जिवंत कविता असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कविमंडळ संघ, बेळगाव यांच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कवयित्री उर्मिला शहा यांच्या चौथ्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
उर्मिला शहा यांच्या कवितांमध्ये भावविश्वाचे प्रभावी दर्शन
उर्मिला शहा यांच्या कवितांमध्ये भाषेच्या विविध शक्यतांचा सुरेख वापर आढळतो. प्रेम, पाऊस, निसर्ग आणि नात्यांमधील सूक्ष्म भावतरंग त्यांनी प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या कविता मानवी जीवनाला अर्थपूर्णता देणाऱ्या आहेत, असे प्रा. सामंत यांनी सांगितले.
सीमाभागात शब्दगंध कविमंडळ संघाने गेली ३६ वर्षे साहित्य चळवळ सातत्याने जिवंत ठेवली, याबद्दल त्यांनी संस्थेचे विशेष कौतुक केले.
स्त्रीजीवन आणि समकालीन वास्तवावर भाष्य
कार्यक्रमातील प्रमुख वक्ते चंद्रकांत बाबर यांनी आपल्या परखड मनोगतातून स्त्रीजीवन आणि समकालीन सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकला. उर्मिला शहा यांच्या कविता सामाजिक चौकटीत अडकलेल्या स्त्रीच्या भावनांना वाट मोकळी करून देतात आणि तिला आत्मभानाची जाणीव करून देतात, असे त्यांनी नमूद केले.
आज समाजात बाह्य देखावा वाढत असताना माणूसपण हरवत चालले आहे. जात, धर्म आणि लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत माणूस निर्मळ माणूस होत नाही, तोपर्यंत खरी मुक्ती शक्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. कला ही संस्कृती आणि भाषेच्याही आधी जन्मलेली असून ती माणसाच्या जगण्याला दिशा देते, असेही त्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. सुधाकर गावडे यांनी स्वागत केले. शब्दगंध कविमंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.
परशुराम खेमणे, गुरुनाथ किरमटे आणि स्मिता किल्लेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कवयित्री उर्मिला शहा यांनी आपल्या मनोगतात काव्यलेखनामागील प्रेरणा आणि साहित्यिक वाटचाल उलगडून सांगितली.
यावेळी प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. आनंद मेणसे, बी. जी. पाटील, शिवाजी शिंदे, अनिल आजगावकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी तसेच शब्दगंध कविमंडळ संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी केले, तर सोनिया शहा यांनी आभार मानले.





