belgaum

स्मार्ट कल्लेहोळ फाउंडेशनच्या बससेवा मागणीची दखल;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातील नागरिकांची प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी स्मार्ट कल्लेहोळ फाउंडेशनने केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. फाउंडेशनने केलेल्या मागणीची दखल घेत केएसआरटीसीचे अधिकारी शिवानंद तलवार यांनी बेळगुंदी–कल्लेहोळ–बेळगाव या प्रस्तावित बसमार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मार्गावरील अंतर मोजून किलोमीटरची नोंद करण्यात आली.

कल्लेहोळ येथील शासकीय कला व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयाच्या वेळेनुसार या मार्गावर नियमित बससेवा सुरू करावी, अशी प्रमुख मागणी फाउंडेशनने केली आहे. महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी व शिक्षकांना पोहोचता यावे आणि सुटीनंतर परतीच्या प्रवासासाठी बस उपलब्ध व्हावी, यानुसार वेळापत्रक निश्चित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी कल्लेहोळ बसचा थांबा गणेश मंदिराजवळ ठेवण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

तीन किलोमीटरची पायपीट टळण्याची अपेक्षा

सध्या नियमित बससेवेअभावी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यापासून सुमारे तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यात ही गैरसोय अधिक वाढते. वेळेवर महाविद्यालयात पोहोचण्यात अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर आणि शैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या वेळेनुसार बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 belgaum

अनेक गावांतील नागरिकांना होणार फायदा

बेळगुंदी–कल्लेहोळ–बेळगाव मार्गावर बससेवा सुरू झाल्यास बेळगुंदी, बिजगर्णी, बेळवट्टी, बडस, बाकनूर, बोकनूर, राकसकोप, येळेबैल, तुडये, सोनोली आणि कावळेवाडी या गावांतील नागरिकांना त्याचा लाभ होऊ शकतो. या मार्गामुळे राकसकोप मुख्य रस्ता आणि वेंगुर्ला रस्ता यांदरम्यान प्रवासाची सोयीची जोडणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

उचगाव येथील रयत केंद्र आणि आरोग्य केंद्रात जाणारे नागरिक, तसेच हिंडलगा आणि मार्केट यार्डकडे जाणारे शेतकरी यांच्यासाठीही ही बससेवा उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

फाउंडेशनच्या पाठपुराव्याला प्रतिसाद

या मागणीसाठी स्मार्ट कल्लेहोळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली विजय मरुचे, बाळू खन्नूकर, सोमनाथ लामजी, भाऊराव वेताळ आणि लक्ष्मण चौगुले यांनी केएसआरटीसी कार्यालयात निवेदन सादर केले होते. त्यानंतर झालेल्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निलेश मुतगेकर यांनी अधिकाऱ्यांना प्रस्तावित मार्गाची माहिती देत प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या.

पाहणीवेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. महाविद्यालयाच्या वतीनेही नियमित बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष महादेव होनगेकर, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश खन्नूकर, देवस्थान कमिटीचे वसंत पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बससेवा लवकर सुरू करण्याची मागणी

बसमार्गाची प्रत्यक्ष पाहणी झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आता आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून महाविद्यालयाच्या वेळेनुसार नियमित बससेवा लवकर सुरू करावी, अशी मागणी होत आहे. बससेवा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे स्मार्ट कल्लेहोळ फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.