बेळगाव लाईव्ह : कारगिल विजय दिनानिमित्त २७ वा कारगिल विजय दिवस आणि सलग तिसऱ्या वर्षी खादरवाडी येथील ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने माजी सैनिक तसेच सध्या भारतीय सैन्यात कार्यरत जवानांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. क्लबचे संस्थापक, प्रशिक्षक व माजी सैनिक अमित बिरजे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त लेफ्टनंट कर्नल शिवाजी कणबरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मलिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धाचा इतिहास, भारतीय जवानांचे शौर्य आणि विजयाचे महत्त्व उलगडणारे प्रभावी लघुनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी परिसरातील माजी सैनिक तसेच भारतीय सैन्यात कार्यरत जवानांच्या पालकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यशनेश वॉटर पार्कचे मालक महेश अर्कसळी आणि मुळवीर ज्वेलर्सचे मालक राजू बेकवडकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात कारगिल युद्धात वीरमरण आलेले जांबोटी (ता. खानापूर) येथील शहीद जवान धोंडीबा देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कारगिल युद्धातील सर्व ज्ञात-अज्ञात वीर शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे निवृत्त लेफ्टनंट कर्नल शिवाजी कणबरकर यांनी कारगिल युद्धातील शूरवीरांच्या पराक्रमाचा गौरव करत युवकांनी देशसेवेची प्रेरणा घेऊन भारतीय सैन्यात भरती होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. माजी सैनिक किरण पाटील यांनीही युवकांना सैन्यभरतीबाबत मार्गदर्शन केले.
देवप्पा कोळेकर यांनी ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबच्या कार्याचा आढावा घेत अमित बिरजे यांच्या युवकांना सैन्य भरतीसाठी मोफत प्रशिक्षण देण्याच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. क्लबचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गजानन दळवी आणि नंदिनी संभुचे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन गुरव यांनी केले. यावेळी ब्रह्मलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक राजाराम खवनेकर, खादरवाडी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुधा राजगोळकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, युवक आणि मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते.
ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमातून राष्ट्रभक्ती, सैनिकांप्रती आदर आणि युवकांमध्ये देशसेवेची प्रेरणा जागविण्याचा संदेश देण्यात आला.





