belgaum

एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी भू-तांत्रिक तपासणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील बहुप्रतीक्षित एलिव्हेटेड कॉरिडॉर (उड्डाणपूल) प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले असून, धर्मवीर संभाजी महाराज चौकात भू-तांत्रिक (Geo-technical) तपासणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, तेथे लावलेल्या फलकावर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी भू-तांत्रिक तपासणी सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), बेळगाव यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, इन्फ्रा सपोर्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स प्रा. लि. यांचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. सध्या सुरू असलेली मृदा तपासणी ही प्रकल्पाच्या आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. या तपासणीत मातीची गुणवत्ता, जमिनीची वहनक्षमता, भूगर्भातील परिस्थिती आणि पुलाच्या खांबांसाठी आवश्यक असलेल्या पायाची रचना निश्चित करण्यासाठी माहिती संकलित केली जाते.

यापूर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देत, सप्टेंबर अखेरीस किंवा त्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले होते. तसेच, प्रकल्पाच्या मार्गातील वीजवाहिन्या, पाणीपुरवठा आणि भूमिगत ड्रेनेज लाईन्सचे स्थलांतर (युटिलिटी शिफ्टिंग) हे प्राथमिक टप्प्यात हाती घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

 belgaum

याशिवाय, प्रकल्पामुळे झाडांची अनावश्यक तोड होऊ नये यासाठी ट्री ट्रान्सलोकेशन (झाडांचे स्थलांतर) तंत्राचा शक्य तितका वापर करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले होते.

धर्मवीर संभाजी महाराज चौकातील भू-तांत्रिक तपासणी सुरू झाल्यामुळे प्रकल्पाने आता तांत्रिक मूल्यांकनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या तपासणीचा अहवाल पूर्ण झाल्यानंतर अंतिम आराखडा निश्चित करून पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता हा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, सध्या सुरू झालेली भू-तांत्रिक तपासणी ही त्या दिशेने झालेले पहिले दृश्यमान पाऊल मानले जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.