belgaum

प्रशासनाची दिशाभूल करत आमच्या जमिनीसह घरांवर ताबा मिळवून आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे त्या अनुषंगाने केलेल्या अर्जाचा विचार केला जाऊ नये. तसेच गुंडांकरवी आमची जागा घरे हडपण्याचा प्रयत्न होत असल्याने आमची मालमत्ता आणि आमच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण केले जावे, अशी मागणी बसव कॉलनी येथील रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज शनिवारी मोठ्या संख्येने जमून शहरातील बसव कॉलनी येथील रहिवाशांनी सादर केलेले उपरोक्त मागणीचे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी त्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

बसवा कॉलनी येथे 550 ते 600 घरे आहेत. ही घरे आरएस नं. 59/1, 59/2, 59/3 आणि 59/4 अशा एकूण 19 एकर 18 गुंठे जागेत रितसर कायदेशीर बाबींची पूर्तता करून बांधण्यात आली आहेत. येथील रहिवासी आपल्या मालकीच्या या घरांमध्ये 20 वर्षांपूर्वीपासून वास्तव्यास आहेत.

या वसाहतीत सरकारकडून आवश्यक सर्व मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कॉलनीचा कांही भाग महापालिका हद्दीत तर कांही भाग कंग्राळी बी. के. ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्या -त्या भागातील रहिवाशी विविध करांच्या स्वरूपातील महसूल नियमितपणे महापालिका आणि ग्रामपंचायतीकडे भरतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून विजेचे आणि पाण्याचे बिल देखील भरले जाते.Basav coloney

एकंदर बसव कॉलनीतील आम्हा रहिवाशांचे जनजीवन सुरळीत सुरू असताना गेल्या डिसेंबर 22 पासून कांही गुंडांनी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. स्वतःला ते आमची घरे असलेल्या जमिनीचे मालक आणि सदर जमिनीचे पूर्वीचे मालक प्रभाकर आर. कलघटगी व कुटुंबीयांचे वटमुखत्यार असल्याचे सांगत आहेत. हे गुंड अलीकडे वारंवार कॉलनीत येऊन कॉलनीतील रहिवाशांना घराचा ताबा सोडण्यास धमकावत आहेत. त्याचप्रमाणे राजकीय दबाव आणि पैशाचा वापर करून ग्रामपंचायतीकडील मालमत्तेवरील नांव बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याव्यतिरिक्त कलघटगी आणि कुटुंबीयांनी आमची घरे असलेली जमीन पुन्हा आपल्या ताब्यात यावी यासाठी प्रांताधिकार्‍यांकडे अर्ज केला असल्याचे समजते.

बसव कॉलनीतील बहुतांश रहिवासी हे गरीब मध्यमवर्गीय आहेत. त्यांनी रीतसर जागा खरेदी करून कर्ज काढून घरे बांधली आहेत. याखेरीज गेल्या जवळपास 30 वर्षापासून ते सरकारचा कर भरत आहेत. एकंदर प्रभाकर आर कलघटगी आणि कुटुंबीयांकडून जोर जबरदस्तीने धमकावून जमिनीसह आमची घरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसे झाल्यास येथील रहिवाशांवर मोठे संकट कोसळून बेघर होण्याद्वारे ते रस्त्यावर येणार आहेत. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन कलघटगी कुटुंबीयांनी केलेला अर्ज (आरए नं. 419 /2022) फेटाळून लावण्याची सूचना आपण प्रांताधिकार्‍यांना करावी. तसेच बसव कॉलनीतील रहिवाशांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय संबंधित जागेवर चढवण्यात आलेली नावे बदलू नयेत, अशी सूचना महसूल खात्याला करावी, अशा आशयाचा तपशील बसव कॉलनी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करण्यापूर्वी आपली तक्रार आणि निवेदनासंदर्भात बसव कॉलनी येथील शिवानंद पट्टणशेट्टी यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.